लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या भोगाळे परिसरात गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजता एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारा नराधम पसार झाला असून, पोलिसांनी अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत पीडित तरुणीला मोठी दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पीडित तरुणीने येथील पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शहरातील एका रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करणारी तरुणी गुरुवारी रात्रपाळीसाठी एस़टी़तून ७ वाजता येथील मध्यवर्ती बसस्थानकात उतरली आणि चालत थेट आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघाली होती. लॉकडाऊनमुळे बाजारपेठही ४ वाजता बंद होती. त्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक किंवा वर्दळ नव्हती. त्यातच या परिसरात कायम अंधार असतो. याच संधीचा फायदा अज्ञात तरुणाने उचलला. संबंधित तरुणी चिंचनाक्याच्या दिशेने चालत जात असतानाच मागून येऊन अज्ञात नराधमाने खेचत थेट समोरच असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन गेला.
भोगाळे येथील रस्त्याकडेला अनधिकृत खोके व हातगाड्या ठेवलेल्या आहेत. त्याचा आडोसा घेत त्या नराधमाने अत्याचार केला. यावेळी मोठी झटापट झाली. पीडित तरुणीने जोरदार प्रतिकार केला असता, त्याने मारहाण केली. त्या परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर बाजूलाच असलेला दगड उचलून त्याने तरुणीला दगडाने बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळावरून तो पसार झाला. जाताना त्या तरुणीचा मोबाईलही घेऊन गेला, अशी माहितीही समोर आली आहे.
पोलिसांनीदेखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेन्द्र पोळ यांनी तत्काळ सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. गुरुवारी रात्रीच संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही टीव्ही फुटेज जमा करण्यात आले आहेत. तसेच संबंधित घटनास्थळही सीलबंद केले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले आहे. तसेच पोलिसांचे एक पथक त्या नराधमाच्या मागावर लागले आहे. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते; परंतु, जोरदार पावसामुळे अडथळे निर्माण झाले.
-----------------------
चिपळुणात पहिली घटना
अशा पध्दतीची घटना चिपळुणात पहिल्यांदाच घडली. शुक्रवारी सकाळी चिपळूण शहरात या घटनेचे वृत्त समजताच एकच खळबळ उडाली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यावर असा प्रकार घडल्याने येथे संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून त्या नराधमाला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
---------------------------
पोलीस अधीक्षक चिपळुणात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ़. मोहितकुमार गर्ग शुक्रवारी चिपळुणात दाखल झाले. घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून त्यांनी माहिती घेत तपासाबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले. तपासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून संबंधिताला लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचनाही त्यांनी येथील यंत्रणेला दिल्या. तसेच शहरातील काही भागांचीही त्यांनी पाहणी केली.
----------------------
चिपळूण बाजारपेठ बंद
या घटनेच्या पार्श्वभूमीवर तपासात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच वातावरण खराब होऊ नये, याची दक्षता घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी दुपारीच बाजारपेठेत गस्त करत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बाजारपेठ बंदही केली. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होती.