रत्नागिरी : ‘वीकेंड’ला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या दोन दिवसांच्या कालावधीत समुद्रकिनारी योगाचा आनंद मिळावा, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘योगा बाय द सी’ हा नवा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून त्याचा प्रारंभ शनिवारी गणपतीपुळे येथे होणार आहे.
पर्यटकांच्या आरोग्याचा विचार करून पर्यटन महामंडळाने ‘योगा बाय द सी’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या शनिवारी (दि.२०) आणि रविवारी (दि. २१) असे दोन दिवस हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढेही हा उपक्रम सुरूच राहणार आहे. त्याची सुरुवात गणपतीपुळे येथून होत आहे. व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज (IAS ) यांच्या संकल्पनेतून व चंद्रशेखर जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहे.
गणपतीपुळे येथे होणाऱ्या या उपक्रमात या दोन दिवसीय सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ६ अशा दोन सत्रांत पर्यटकांसाठी योगा आयोजित केला जाणार आहे. अजय वाईकर आणि स्वप्नाली जुवेकर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
समुद्राच्या लाटेच्या लयबद्ध आवाजात पर्यटकांना ध्यानाचा आनंद मिळणार आहे.