कोकणातील समुद्रकिनारे, डोंगर, धबधबे, मंदिरे, गडकिल्ले आदी प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांचे देशातील पर्यटकांनाच नव्हे तर देशाबाहेरील पर्यटकांनाही आकर्षण असल्याने पर्यटनासाठी फार मोठी पर्वणी लाभली आहे. त्यामुळे आता हळूहळू पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. कोकणातील पाऊसही पर्यटकांना आकर्षक करतो. त्यामुळे कोकणातील किनाऱ्यांवर तसेच धबधब्यांवर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लाॅकडाऊनचे निर्बंध शासनाने आता हळूहळू कमी केले आहे. त्यामुळे आता पर्यटनाला सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) कोकण विभाग सज्ज झाला आहे. अजूनही कोरोनाची अनिष्ट छाया सर्वत्र आहे, हे लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेऊन एमटीडीसीने आपली सर्व निवासस्थाने खुली केली आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण तसेच कोरोना चाचण्या करून त्यांची आणि पर्यटकांचीही सुरक्षितता जपली आहे. शासनाचे निर्बंध उठल्यास १० ते १२ दिवसांतच एमटीडीसीची कोकणातील सर्वच निवासस्थाने ३० ते ४० टक्के आरक्षित झाली आहेत. आता हळूहळू पर्यटन क्षेत्राला गती मिळू लागली आहे. त्यादृष्टीने एमटीडीसीने पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
- शोभना कांबळे