रत्नागिरी : गणपतीपुळे पर्यटन विकासाचा ७८ कोटी ७ लाख ११ हजार रुपयांचा आराखडा शासनाकडे पाठविल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, शनिवारी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा आराखडा पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आराखडा योग्य सुधारणांसह शासनाकडे पाठविला जावा, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातील काही सुधारणा निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर उंदराची सुंदर प्रतिकृती असताना तेथून बऱ्याच अंतरावर हॉटेलजवळील एका चौकात उंदराची दुसरी प्रतिकृती बनविण्याचा अट्टाहास नागरिकांनाही पटलेला नाही. एकाच मंदिराजवळ दोन उंदिर असावेत का? हा प्रश्न आहे. शंकराच्या मंदिरात पिंडीसमोर ज्याप्रमाणे नंदीची मूर्ती असते तसेच गणपती मंदिराजवळच उंदराची मूर्तीही असावी, ही भक्तांची भावना आहे. आराखड्यात वाहनतळ विकसित करणे, किमान २० स्त्री व २० पुरुष प्रसाधनगृहे, रस्ते व सांडपाणी व्यवस्था यासाठी ३ कोटी ४५ लाख रुपये अंदाजित खर्च दाखविण्यात आला आहे. यासाठी जी २१ एकर जागा लागणार आहे, त्यामध्ये १३४ जागा मालक आहेत. त्यापैकी ७१ मालकांनी या प्रस्तावाचा विचार करू, असे लिहून दिले आहे. उर्वरित मालकांनी अद्याप यासाठी तयारी दर्शवलेली नाही. ज्या प्रस्तावासाठी ३ कोटी ४५ लाख अंदाजित खर्च दाखविला आहे, त्यातील जागा खरेदीसाठीच ३ कोटी ४५ लाख लागणार आहेत. त्यामुळे आराखड्यातील या कामासाठी सुचविलेली रक्कम प्रत्यक्षात लागणाऱ्या रकमेपेक्षा कमी आहे. आराखड्यात सांडपाणी व्यवस्थेसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच मालगुंड व भगवतीनगर नळपाणी योजनेचा प्रस्तावही आहे. ही कामे नक्कीच चांगली आहेत. (प्रतिनिधी) सुरक्षा योजना वाऱ्यावर... नवीन पर्यटन आराखड्यानुसार गणपतीपुळे मंदिराजवळील सुरक्षा योजना प्रस्तावित आहे. पण या योजनेची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. राज्य शासन सुरक्षा योजनेची जबाबदारी घेण्यास तयार नाही. मंदिर व्यवस्थापन व ग्रामपंचायतही ही योजना सांभाळण्यास तयार नाहीत. तसेच जे गाळे येथे पडून आहेत ते सीआरझेडमध्ये आहेत. तेथेच पुन्हा गाळे उभारण्याचा चंग बांधण्यात आला आहे.
पर्यटन आराखडा शासनाकडे गेलेलाच नाही
By admin | Published: April 03, 2016 9:49 PM