लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : दापोली तालुका हा पर्यटन तालुका म्हणून राज्यासह सर्वत्र परिचित आहे. येथील पर्यटन हे पर्यटकांना खिळवून ठेवते. दापोली येथील पर्यटन वाढीला आणि येथील पर्यटनाला दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी दापोलीतील पर्यटन व्यावसायिकांसह खासदार सुनील तटकरे यांची रोहा (जि. रायगड) येथे भेट घेऊन दापाेलीतील पर्यटन स्थळांना ‘ब’ दर्जा मिळावा, अशी मागणी केली.
दापाेली तालुक्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांना पर्यटनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी निवेदन दिले. यावेळी खासदार तटकरे यांनी दापोलीतील पर्यटनवाढीला चालना मिळेल आणि येथील पर्यटनाला दर्जा प्राप्त होईल, असे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार संजय कदम, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती राजेश गुजर, पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, कर्दे सरपंच सचिन तोडणकर, उद्योजक पांडुरंग बांद्रे, मंडणगड युवक तालुकाध्यक्ष लुकमान चिखलकर, आसुद उपसरपंच पिंट्या माने, सदस्य वैभव धामणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी सभापती राजेश गुजर यांनी दापोली तालुक्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. दापोली पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी मिळावा, यासाठीही निवेदन देण्यात आले. तसेच दापोली तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना ५० टक्के क्षमतेने हाॅटेल व रिसाॅर्ट सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी, दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील चंद्रनगर, कोळथरे, करंजगाव, आसुद, मुरुड, कर्दे, लाडघर, सालदुरे, हर्णै, दाभोळ, पाळंदे, आडे, पाडले, आंजर्ले, केळशी यांना ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
------------------------------
रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांची माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेतली व तटकरे यांना पुष्पगुष्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सभापती राजेश गुजर, सभापती योगिता बांद्रे यांच्यासह व्यावसायिक उपस्थित हाेते.