रत्नागिरी : डिसेंबर महिना सुरू होताच, आता पर्यटकांना कोकणचे वेध लागले आहेत. हळूहळू थंडीला सुरुवात झाल्याने या आल्हाददायी वातावरणात भटकंती करण्यासाठी पर्यटकांची तयारी सुरू झाली आहे. आठ डिसेंबरपासून पर्यटक जिल्ह्यात येण्यास सुरुवात होत आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ ते ८० टक्के झाले आहे.कोकणात थंडीच्या हंगामात पर्यटनाला बहर येतो. कोरोना काळात दोन वर्षे पर्यटन पूर्णपणे थांबले होते. गेल्या डिसेंबरपासून कोरोना कमी झाल्याने पुन्हा हळूहळू पर्यटन वाढू लागले आहे. गेल्या वर्षभरात पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मे महिन्याप्रमाणेच यंदा हिवाळी पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.शाळा - महाविद्यालयातील मुलांच्या प्रथम सत्रातील परीक्षाही आता आटोपल्या आहेत. त्यामुळे थंडीच्या ‘हेल्दी सीझन’मध्ये पर्यटक जिल्ह्यातील नयनरम्य पर्यटन स्थळांकडे येण्यासाठी उत्सुक आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांकडे पर्यटकांची पावले आताच वळली आहेत. त्याचप्रमाणे गुहागर येथील वेळणेश्वरला पर्यटकांची अधिक पसंती असते. त्या दोन्ही ठिकाणच्या एमटीडीसीच्या निवासस्थानांचे आरक्षण वाढू लागले आहे. ८ डिसेंबरपासून अगदी ५ जानेवारीपर्यंत गणपतीपुळे येथील आरक्षण आताच ७५ ते ८० टक्के झाले आहे. त्याचबरोबर वेळणेश्वरचेही आरक्षण होऊ लागले आहे.रत्नागिरीतील सागरकिनाऱ्यांचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्याने गणपतीपुळे, पावस ठिकाणी येणारे पर्यटक सागर किनाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणावर वळतात. त्यामुळे आता हळूहळू रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास सुरुवात होणार आहे. सध्या वातावरण अधिकच आल्हाददायी असल्याने नाताळच्या सुटीसाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दीर्घ काळ राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी विविध पर्यटन व्यावसायिकही पुढे सरसावले आहेत.पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात २५६ निवास न्याहरी योजनेचे लाभार्थी सेवा देत आहेत. या व्यवसायात येण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा एमटीडीसीकडून देण्यात आली आहेत. एमटीडीसीची सर्व निवासस्थाने पर्यटकांसाठी सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. खासगी व्यावसायिकांनीही त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.संस्कृती उलगडणारपर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ‘महाभ्रमण’ ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या त्या भागातील संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती आदींची ओळख पर्यटकांना करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. याद्वारे जिल्ह्यातही कृषी पर्यटन, निसर्गरम्य स्थळांचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी पर्यटन व्यावसायिक करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. एमटीडीसीच्या गणपतीपुळे येथील निवासस्थानाचे आरक्षण ८ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीसाठी आताच ७५ ते ८० टक्के झाले आहे. हा कालावधी १५ जानेवारीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यंदाचा हिवाळी पर्यटनाचा हंगामही हाऊसफुल्ल जाईल. - संजय ढेकणे, व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (कोकण विभाग)