दापाेली : पुण्यातून पर्यटनासाठी आलेल्या सातजणांनी मुरूड (ता. दापाेली) येथील रिसाॅर्टमध्ये धुडगूस घातल्याचा प्रकार १० जूनला सायंकाळी ५:५० वाजता घडला. या पर्यटकांनी रिसाॅर्टमधील केअर टेकर आणि कर्मचाऱ्यांना दमदाटीही केली. या प्रकरणी दापाेली पाेलिसांनी सातजणांवर बेकायदा जमाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रम इम्यान्यल अनाेलिक, विशाल शशिकांत पडळ, माधव मनाेहर निलेवाड, कृष्णा मच्छिंद्रनाथ यडांयत, गिरीष माेहन चव्हाण, नितीन केदारी आणि मिखाईल गायकवाड (सर्व रा. पुणे) अशी सातजणांची नावे आहेत. हे सातजण १० जूनला सायंकाळी दापाेली तालुक्यातील मुरूड येथील सिल्वर सेंट ब्रीज रिसाॅर्ट येथे दाेन चारचाकी गाड्या घेऊन आले हाेते. सातजणांनी रिसाॅर्टमध्ये येऊन केअर टेकर व कामगारांना दमदाटी करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच रिसाॅर्टमधील कर्मचारी विश्रांती घेत असलेल्या खाेलीत हे सर्वजण जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी खाेलीचा ताबा घेऊन खाेलीतील सामान अस्ताव्यस्त करून नुकसान केले.
यातील विक्रम अनाेलिक याने आपण वकील असल्याचे सांगून केअर टेकर व कामगारांच्या खाेलीचा ताबा घेतला. त्यानंतर दाेघांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रिसाॅर्टच्या केअर टेकरने दापाेली पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार सातजणांवर भारतीय दंड विधान कायदा कलम ४५२,१४३,१४७,१४९,४२७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दापाेली पाेलिस करीत आहेत.