रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या शहरातील झाडगाव येथील सागरी संशोधन केंद्राच्या प्रेक्षणीय अशा मत्स्यालयाला गेल्या दोन महिन्यात २९,१६३ मत्स्यप्रेमींनी भेट दिली असून, गेल्या दीड वर्षात राज्यातील तसेच परदेशातील ३ लाख २९ हजार ३५१ पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यात १ लाख ५८ हजार ६६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चित्ताकर्षक अशा या मत्स्यालयात गोड्या पाण्यातील मासे, सिक्लीड मासे, प्लांटेड (पाण वनस्पती), तसेच सागरी माशांची सुंदर मांडणी व सजावट करण्यात आली आहे. मत्स्यालयासाठी आधुनिक फिल्ट्रेशन व प्रकाश योजनेचा उपयोग करण्यात आला आहे. या मत्स्यालयात गोड्या तसेच सागरी पाण्यातील जवळपास ९० प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने गोड्या पाण्यातील अरोवाना, हम्पी हेड फ्लॉवर हॉर्न फिश, डिस्कस मासे तर खाऱ्या म्हणजेच सागरी पाण्यातील लायन फिश, बटरफ्लाय माशांच्या विविध प्रजाती, निमो मासे तसेच डॅमसेल माशांच्या विविध प्रजाती असे नानाविध आकर्षक मासे पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. प्लांटेड अॅक्वेरिअम शौकिनांकरिता विविध २० प्रकारच्या पाण वनस्पतींनी व आधुनिक तंत्रज्ञानाने हे मत्स्यालय सजले आहे. नवीन रुप घेतलेले हे मत्स्यालय पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेट देताहेत. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने मत्स्यालय हाऊसफुल्ल होत आहे. या मत्स्य संग्रहालयामध्ये विविध २५४ प्रजातींचे समुद्री जलचर रसायनामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत. शंख, शिंपल्यांच्या विविध प्रजातीही येथे मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉल्फीन मासा, ४० फुटी लांबीच्या महाकाय देवमाशाचा सांगाडा तसेच ५० वर्षापेक्षाही जास्त काळ जतन केलेले जिवंत कासव हे विशेष लक्ष वेधून घेतात. पूर्वी हे मत्स्यालय पेठकिल्ला येथील जुन्या इमारतीत होते. डिसेंबर २०१४ मध्ये ते नव्या जागेत आणण्यात आले आहे. या दीड वर्षांच्या कालावधीत १ लाख ७० हजार ६८० पर्यटकांनी या मत्स्यालयाला भेट दिली आहे. साधारणत : एप्रिल, मे या उन्हाळी सुटीच्या कालावधीत २९,१६३ पर्यटकांनी येथे मत्स्य दर्शनाचा लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत एकूण ३ लाख २९ हजार ३५१ मत्स्यप्रेमींनी या मत्स्यालयाला भेट दिली आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीच्या मत्स्यजगाकडे पर्यटकांचा ओढा
By admin | Published: June 05, 2016 12:20 AM