लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : काेकणात शिमगोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे जपल्या जात आहेत. धुळवडीच्या दिवशी
खेर्डी चंडिकादेवीचा शेरण काढण्याचा कार्यक्रम रंगला हाेता.
दापोली तालुक्यातील खेर्डी गावात जपल्या जात असलेल्या शेरणे काढण्याच्या परंपरेला खूप महत्त्व आहे. या देवीच्या सणाला मुंबई, पुणे व पंचक्रोशीतील अनेक भाविक येतात. परंतु, यावर्षी शासनाने काही निर्बंध घातल्यामुळे या देवीची यात्रा रद्द करण्यात आली. ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये देवीचा सालाबादप्रमाणे शेरणे काढणे कार्यक्रम पार पडला.
शेरणे काढणे म्हणजे मंदिरापासून काही अंतरावर देवीचा नारळ जमिनीत खोलवर लपवून ठेवला जातो. पालखीचे भाेई तो नारळ शोधून काढतात. पालखी नाचवली जाऊन ज्या ठिकाणी शेरणे लपवून ठेवलेले असते, त्या ठिकाणी पालखी थांबते. ज्या ठिकाणी शेरणे जमिनीत असतात, त्याच ठिकाणी नेमकी पालखी जाऊन उभी राहते आणि हा सगळा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतात.
ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून या गावाने जपली आहे. जोपर्यंत शेरणाचा नारळ शोधला जात नाही, तोपर्यंत पालखी देवळात परत जात नाही. शेरणे शोधल्यानंतर पालखी देवीच्या मंदिरात येऊन बसते.
चाैकट
शेरणे शोधण्यापूर्वी देवी सहाणेवर बसते. तिची ओटी भरली जाते, काट खेळ खेळला जातो. होळीला प्रदक्षिणा घालून पालखी शेरणे शोधण्यासाठी जाते. शेरणे शोधून देवीची पालखी मंदिरात आल्यावर पालखीची सांगता होते. अशी ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून या गावाने जपली आहे.