हर्षल शिराेडकर
खेड : कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी, एन्राॅन पुलांसह परशुराम घाटही खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीला ‘ब्रेक’ लागला आहे. परशुराम घाटात पर्यायी मार्ग तयार करून हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरु करण्यात प्रशासनाला यश आले असले, तरी गेले चार दिवस अवजड वाहने रस्त्यावरच अडकल्याने चालकांचे खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.
गतवर्षी तुळशी-विन्हेरे या पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविल्याने वाहनचालक किंवा प्रवाशांचा तितकासा खोळंबा झाला नव्हता. मात्र, यावेळी चिपळूण तालुक्याच्या हद्दीतील वाशिष्ठी आणि एन्रॉन या दोन्ही पुलांसह परशुराम घाटातील रस्ताही एका बाजूने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल खचल्यानंतर गोव्याकडे जाणारी वाहतूक एन्रॉन पुलावरून वळविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, पाण्याच्या दाबाने एन्रॉन पूलही खचल्याने हा पूलही वाहतुकीसाठी बंद करावा लागला. काही वाहनचालकांनी फरशी तिठा येथून रेल्वे स्थानकाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याचा आधार घेत गांधारेश्वर पुलामार्गे चिपळूण शहर गाठण्याच्या प्रयत्न केला. मात्र, हा संपूर्ण परिसर पाण्याखाली असल्याने तो प्रयत्नही यशस्वी झाला नाही. सद्यस्थितीत परशुराम घाटात जिथे रस्ता खचला आहे, तिथे पर्यायी मार्ग तयार करून हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र, मालवाहू ट्रक, आराम बसेस यासारख्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरून परशुराम घाट पार करणे शक्य न झाल्याने ही सारी वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहेत. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती कधी पूर्ववत होणार, याबाबत कोणताच अंदाज बांधता येत नसल्याने महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना आणखी किती दिवस थांबावे लागणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
--
चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात खचलेला रस्ता.