मंडणगड : तालुक्यात मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मात्र, पावसामुळे माती ठिसूळ झाल्याने पणदेरी घाटात दरड काेसळण्याची घटना १६ सप्टेंबर २०२१ राेजी सकाळी घडली. त्यामुळे घाेसाळे-पणदेरी मार्गावरील वाहतूक काहीकाळासाठी बंद ठेवण्यात आली हाेती.
दरड कोसळ्याने घोसाळे व मंडणगडकडे येणारा वाहतुकीचा रस्ताच बंद झाला हाेता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यासाठी दरड साफ करण्याच्या कामास सुरुवात केली. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने जेसीबी व अन्य सामग्री पाठवून दरड साफ करण्याचे काम सुरू केले. दुपारनंतर पूर्ण दरड साफ होऊन वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील घाटाचे परिसरात यंदाचे पावसात सुरू असेलेली अतिरेकी वृक्षतोड दरड खचण्यास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष या घटनेनंतर पुन्हा एकदा पुढे आला आहे. जमिनीची धूप थांबवणारी झाड तोडण्यात आल्याने दरडी खचण्याचे प्रसंग घडतात. यावर्षी शेनाळे, केळवत पालवणी, तुळशी पंदेरी इत्यादी घाटांचे ठिकाणी पावसातही वृक्षतोड सुरू असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. वनविभागाकडे या संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.