लांजा : गोवा गुटख्याची पाकिट सिंधुदुर्गहून लांजा येथे विक्रीसाठी घेऊन येणारा टेम्पो पोलिसांनी रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमाराला पकडला. गुटख्याच्च्या १४ प्लास्टिक बॅगा जप्त करण्यात आल्या असून, त्याची किंमत ५३ हजार ५५० रुपये इतकी आहे. लांजा येथील वाहतूक शाखेतील पोलीस नाईक चेतन अनंत उतेकर यांनी ही कारवाई केली.रविवारी रात्री लांजा शहरातील शांतीनगर भागात महेंद्रा पिकअप टेम्पो फिरत असल्याचे पोलीस नाईक चेतन उतेकर यांच्या लक्षात आले. टेम्पोतील माल ज्या ठिकाणी द्यायचा होता ते ठिकाण चालकाला सापडत नसल्याने त्या परिसरात टेम्पो घिरट्या घालताना उतेकर यांना दिसला. टेम्पोला हात दाखवून चेतन उतेकर यांनी चालकाला थांबायला सांगितले. त्यानुसार चालक प्रकाश मुलचंद निरंकारी (२९, रा. गांधी नगर, कोल्हापूर) टेम्पो (एमएच ०९ सीयु ७९८० ) येऊन थांबला.चालक प्रकाश यांची उतेकर यांनी गाडीत काय आहे अशी विचारणा केली असता गाडीमध्ये कुरकुरे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, चेतन उतेकर यांना गाडीतून गुटख्याचा वास येत असल्याने त्यांनी गाडी उघडून काय आहे ते दाखविण्यास सांगितले.
गाडी उघडून दाखवली मात्र पुढील भागामध्ये कुरकुरे यांचे पॉकेट दाखवण्यासाठी ठेवण्यात आलेली होती. गाडी उघडताच गुटख्याचा वास जास्त आला. त्यावेळी कुरकुरेची पॉकेट बाजूला केल्यानंतर मागील बाजूला १४ प्लास्टिक बॅगामध्ये गोवा गुटख्याची पॉकेट भरण्यात आलेली उतेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती ताब्यात घेतली.