चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एकाच वेळी अनेक अवजड वाहने आल्याने व त्यातच चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने बुधवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक ठप्प झाली. वाहतूक नियंत्रक विभागाचे पोलीस नसल्याने संपूर्ण घाट वाहनांनी व्यापला. त्यातच घाटात जागोजागी केलेल्या खोदाईमुळे दरडीचा धोका असल्याने अनेक जण भयभीत झाले होते.परशुराम घाटात चौपदरीकरणांतर्गत संरक्षक भिंत उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत दीडशे मीटरहून अधिक संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र संरक्षक भिंती सोबतच डोंगराच्या बाजूने खोदाई व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्त्यालगतच मोठमोठे दगड व भरावाचे माती ठेवले आहे. त्यामुळे या घाटातून एकेरी वाहतूक करणे शक्य आहे. तरी देखील दोन्ही बाजूने अवजड वाहने सोडले जात असल्याने अनेकदा या घाटात वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत.अशातच बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये अवजड वाहनांचे एसटी व कंपन्यांच्या बस देखील अडकून पडल्या होत्या. परशुराम मंदिर फाटा ते सवतसडा धबधब्यापर्यंत संपूर्ण घाट वाहनांनी व्यापून गेला होता. त्यानंतर पीर लोटे येथील वाहतूक विभागाचे पोलीस तेथे दाखल झाले. त्यानंतर काही वाहनांची त्यातून सुटका झाली. मात्र त्यानंतरही अनेक वाहने अडकून पडले होते.
Parshuram Ghat: परशुराम घाटात वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 7:42 PM