रत्नागिरी : शहर परिसरामध्ये केबल टाकणे तसेच पाईपलाईनसाठी रस्त्यांवर खुदाईची कामे सुरू आहेत. ही खुदाईची कामे केल्यानंतर रस्ते वेळीच दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गोडबोले स्टॉप ते मारुती मंदिर यादरम्यानच्या रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने लोक हैराण झाले आहेत.
लॉकडाऊनची भीती वाढली
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक ठरत असल्याने लोकांसमोर भीती निर्माण झाली असली तरी, शासन नियमांचे पालन केले जात नाही. वाढत्या कोरोनाबाधितांमुळे पुन्हा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होण्याच्या शक्यतेने लोकांची धावपळ उडाली आहे. लॉकडाऊन झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
महामार्गावर धुळीने हैराण
रत्नागिरी : महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला पुन्हा वेग आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यात महामार्गावर रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. या खुदाईमुळे माती वर आली आहे. त्यामुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. त्यासाठी शासनाच्या नियमांप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा, असे वेळोवेळी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तरीही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.
पाणीपट्टी, घरपट्टी वसुली जोरात
रत्नागिरी : मार्च एंडिंग आला की ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपरिषदांकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मोहीम जोरात राबविण्यात येते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून या वसुलीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. तरीही कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून वसुलीसाठी जोर धरला जात आहे.
गैरसोयीने ग्राहकांमध्ये नाराजीच
राजापूर : तालुक्यातील भू येथील बीएसएनएलची सेवा ठप्प असून, मोबाईल टाॅवर गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद असल्याने, ग्राहकांची गैरसोय होत आहे. वारंवार तक्रारी करूनही याबाबत दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अनेक गावांमध्ये पाणी कपात
रत्नागिरी : कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्याचा फटका आतापासूनच ग्रामस्थांना बसू लागला आहे. पाण्याची पातळी कमी तसेच धरणातील पाण्याचे साठे कमी झाल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे.
शिंपल्या, कालवांना मागणी
रत्नागिरी : माशांची आवक कमी झाल्याने मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मासळी बाजारात मासळी मिळत नसल्याने शिंपल्या, कालवांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. खाड्यांमधील खडकाळ भागात जाऊन कालवे काढले जात आहेत. तसेच शिंपल्याही काढल्या जात आहेत. त्यांना दरही चांगला मिळत आहे.
मुख्य रस्त्याची दुरुस्ती
देवरुख : साखरपा परिसरातील अंतर्गत व मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. शासनाकडून आलेला सर्व निधी दुरुस्तीवर खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी धडक मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.
थंड पेयांना मागणी वाढली
रत्नागिरी : कडक उन्हामुळे अंगाची आग होत आहे. तसेच अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने लोक हैराण झाले आहेत. उन्हाळ्यामुळे शहर परिसरात रस्त्याच्या कडेला थंड पेयाची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरबत, ताक, लस्सी पिण्यासाठी हातगाडीवाल्यांकडे गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोरोना लसीकरणाला प्रारंभ
चिपळूण : शहरातील अपरांत हाॅस्पिटल येथे गुरुवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. यतीन जाधव यांनी केले होते. शासनाच्या सूचनेनुसार ४५ ते ५९ वयोगटांसाठी कोणत्याही आजाराची लक्षणे असणाऱ्या सर्टिफिकेटची गरज भासणार नाही, असेही जाहीर करण्यात आले होते.
वीजखांब बदलण्याची मागणी
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली मानवाडी ते खडपेवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या डिगोली या पाऊलवाटेवरील आठ ते दहा वीजखांब गंजले असून, ते धोकादायक बनले आहेत. जमिनीपासून काही अंतरावरच खांब गंजून भोके पडली आहेत. तातडीने खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.