खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे सर्व्हिस रोडवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः येथील रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली होती. अनेक छोटे-मोठे अपघात आणि नित्याची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक हैराण झाले होते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले आणि संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर लगेचच ठेकेदाराने सर्व्हिस रोडच्या क्राँक्रिटीकरणाचे काम सुरु केले. मात्र, त्यामुळे भरणे नाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
खवटी ते परशुराम या संपूर्ण हद्दीत सर्व्हिस रोडची कामे झालेली नाहीत. काही ठिकाणी ती अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी, चारचाकी गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे हा दोन्ही बाजूचा रस्ता तत्काळ सुस्थितीत केला नाही तर याच खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल आणि संबंधित ठेकेदाराला त्याच खड्ड्यात बसवून आंघोळ घालू, असा सज्जड दमच माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
राष्ट्रवादीने दिलेल्या इशाऱ्यामुळे मंगळवारी रात्री भर पावसात त्या ठेकेदाराने सर्व्हिस रोडचे क्राँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. पावसाळ्याच्या अगोदरच हे काम करणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदारावर कुणाचाच अंकुश नसल्याने सर्व्हिस रोडची कामे अपूर्ण आहेत. लवेल, लोटे या दरम्यान रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून प्रत्यक्षात खड्ड्यात हरवलेल्या सर्व्हिस रोडचे काँक्रिटच्या नवीन रस्त्यामध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू झाले.
काँक्रिट रस्त्याचे काम सुरू असल्याने रात्रीपासूनच भरणे नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक एकेरी मार्गावरून वळविण्यात आल्याने या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भरणे नाक्यावर नेहमी वर्दळ असते. त्यातच महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडीची समस्या याठिकाणी गेल्या वर्षभरापासून सातत्याने त्रासदायक ठरत आहे.
गेल्या वर्षभरापासून भरणे नाका येथे फ्लायओव्हरचे काम सुरू असून, काही कारणांमुळे हा उड्डाणपूल अजून पूर्ण होऊ शकलेला नाही. उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक ही दोन्ही बाजूच्या तात्पुरत्या सर्व्हिस रोडवरुन वळविण्यात आली होती. परंतु, पावसाळा सुरू झाल्यानंतर या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे.
..................
म्हणून आम्ही रस्त्यावर
रोज अनेक अपघात याठिकाणी होत आहेत. पण ठेकेदार आणि निर्ढावलेल्या प्रशासनाने तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी अशीच भूमिका ठेवली असल्याने आम्हाला जनतेसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संजय कदम यांनी दिली.