सावर्डे : सावर्डे (ता. चिपळूण) येथे रविवार आठवडा बाजार असल्याने मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी होत असते. रविवारी महामार्गावरून प्रवास करीत असताना एका चारचाकी वाहनाने रविवार सुट्टीच्या दिवशी सावर्डे येथे महामार्गावर उभ्या असलेल्या आॅटो रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, ही कारवाई सुरु असताना काही ग्रामस्थ तेथे जमले. त्यानंतर या वाहनाने पळ काढला. त्यामुळे त्या गाडीचा ग्रामस्थांकडून पाठलाग करण्यात आला. बऱ्याच वेळानंतर ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असल्याचे कळल्यानंतर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली.सुमो गाडीतून आलेले अधिकारी हे कार्यालयीन पेहरावात नसल्याने त्यांना कुणीच ओळखले नाही. त्यांनी काही आॅटो रिक्षांवर कारवाई केली. काही वेळाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीसह परगावातील लोकांची गर्दी जमा झाली.
त्यानंतर सविस्तर माहिती विचारण्यासाठी स्थानिक पत्रकार प्रतिनिधी गेले असता त्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गाडीच्या काचा बंद करून ते पुढे गेले असता स्थानिक ग्रामस्थ एकटवले.
अधिकारी न थांबता पुढे गेले त्यांनी स्वत:चे नाव आणि हुद्दाही सांगितला नसल्याने उपस्थितांच्या मनात तर्कवितर्क येऊ लागले. नक्की परिवहन अधिकारीच आहेत की, अन्य कुणी? अशा शंका तेथे उपस्थितांनी निर्माण केल्याने गाडी तिथून निघताच तिथे असणाºया उपस्थितांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीच्या काचा बंद करुन अधिकाऱ्यांनी पलायन केले.गाडी चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर दहा मिनिटांतच ती फिरून सावर्डे बसस्थानकाकडून परत आली. मात्र, महामार्गावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांना पाहून गाडी सावर्डे पोलीस स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर सर्व शांत झाल्यावर पुन्हा तीच गाडी दोन होमगार्डसह बसस्थानकावर थांबली. ही गाडी परिवहन अधिकाऱ्यांची असल्याचे समजले अन् त्यानंतर हा सारा प्रकार मिटला.
आजपर्यंत परिवहन अधिकारी वाहनांच्या मागे लागतात पण सावर्डेत तर चित्र उलटे पहायला मिळाले. परिवहन अधिकाऱ्यांच्या गाडीचा पाठलाग उपस्थित ग्रामस्थांकडून पहायला मिळाला. हे अधिकारी कोण? यासंदर्भात अधिकाऱ्यांशी विचारपूस केली असता त्यांन ताकास तूर लागू न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.