लांजा : गोव्याहून - मुंबईच्या दिशेने २० टन वजनाची क्रेन घेऊन जाणारा कंटेनर रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान वेरळ घाटामधील यु आकाराच्या वळणावर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ६ तास ठप्प झाली हाेती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या हाेत्या. क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.
गोव्याहून बाबू विष्णू लोहार (३०, रा. राजगोरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा कंटेनर (एमएच ४८, एआर ९२५९)ने २० टन क्रेन घेऊन मुंबईच्या दिशेने जात हाेता. वेरळ घाट उतरत असताना यु आकाराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गावर क्रेनसह उलटला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली हाेती. या अपघाताची माहिती मिळताच लांजाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, वाहतूक पोलीस रहिम मुजावर, भालचंद्र रेवणे, महिला पोलीस तृप्ती सावंतदेसाई तसेच होमगार्ड यांनी घटनास्थळी जाऊन खोळंबलेली वाहतूक व प्रवाशांना शांत केले. त्यानंतर रत्नागिरी येथून दुपारी १२ वाजता क्रेन आल्यानंतर कंटेनर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, उतार व यु आकाराचे वळण तसेच अरुंद असलेला रस्ता यामुळे कंटेनर उभा करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसरी क्रेन बोलावण्यात आली.
दोन्ही क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर व क्रेन ३.३० वाजता बाजूला करण्यात आली. त्यानंतर तब्बल ६ तासाने वाहतूक सुरळीत झाली.
-----------------------------
महिनाभरातील तिसरा अपघात
सहा तासांच्या कालावधीत रत्नागिरी येथे तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक देवधे काजरघाटीमार्गे तसेच आसगेमार्गे वळविण्यात आली होती. तरीही देवधे शेतीशाळेपर्यंत तसेच आंजणारी घाटापर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर या महिन्याभरामध्ये झालेला हा तिसरा अपघात आहे. वाहनचालक व प्रवाशांनी येथे पर्यायी मार्गाची व्यवस्था तसेच वळण रुंदीकरणाची मागणी केली आहे.