खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी (२५ जून रोजी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली होती. ही दरड हटविण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे वाहने अडकून पडली होती. तासाभरानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता खेड तालुक्यातील भोस्ते घाटात डोंगराच्या शिखराकडून दगड मिश्रित माती घसरू लागली व काही क्षणातच भला मोठा दगड खाली कोसळला. महामार्गावर आलेल्या दगड मातीच्या ढिगाऱ्यामुळे एका बाजूची वाहतूक पूर्ण ठप्प झाली.
शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर दरड कोसळूनही तासभर कोणतीच हालचाल करण्यात आलेली नाही. गेली चार वर्षे कल्याण टोलवेज कंपनी कशेडी ते परशुराम या ४४ किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम करत आहे. मात्र, भोस्ते घाटातील कोसळलेली दरड हटवण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.भोस्ते घाटाचे रुंदीकरण करताना काही ठिकाणी उभा डोंगर कापून काढण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या पहिल्या महिन्यातच महामार्गावर दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला. भोस्ते घाटात दरड कोसळल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठेकेदार कंपनीला जाग आली आणि ९ वाजण्याच्या सुमारास जेसीबीसह कंपनीचे कामगार रस्त्यावर पडलेली दगड माती हटवण्यासाठी हजर झाली.दरम्यान, घाटात वाहनांची लांब रांग लागली होती. काही वाहनचालकांनी थोडी माती दगड रस्त्यावरून हटवून छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू केली.