लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : : कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत मोडकाआगर धरणावरील नवा पूल वाहतुकीला सुरू करणार, असा शब्द मनीषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिला. मोडकाआगर पूल आणि गुहागरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार जाधव यांनी मंगळवारी घेतला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत किरकोळ कामात गणना केलेले मोडकाआगर पुलाचे काम गेले वर्षभर सुरू आहे. या पुलामुळे जनता, एस. टी. आणि खासगी वाहतूकदार वैतागले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुरू झाली नाही, तर पुढचे पाच महिने पुन्हा एकदा जनतेला १५ किलोमीटरचा वळसा घालून शृंगारतळीत जावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. मोडकाआगरच्या पुलावर अधिकाऱ्यांसोबत आमदार थांबल्यावर मनीषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने आणि त्यांचे बंधू दोघांनीही पुलाचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले. पुढच्या चार-पाच दिवसांत पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होईल. ते काम झाले की जुना पूल तोडून इथले दगड आणि माती तेथे टाकणार. क्रॉंक्रिट रोड होणार नाही. खडीकरण करून वाहतूक सुरू करणार, असे सांगितले.
आमदार जाधव म्हणाले की, तुमचे काम चांगले आहे, गुणवत्तापूर्ण आहे, त्याबद्दल वाद नाही. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर पावसाळ्यात बाजूने वाहतूक पूर्ण होऊ शकत नाही. मी सर्वांना विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट जाहीर करत नाही, असे सांगितले़. हे तालुक्यातील पहिलेच काम आहे. हे काम करणारच. आता किरकोळ काम उरले आहे. पूल सुरू करतानाच रस्त्याच्या कामालाही सुरुवात करत आहोत. न्यायालयापासून पुलापर्यंत एका बाजूचा रस्ताही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन शिवाजी माने यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी सलीम शेख, उपअभियंता मराठे उपस्थित होते.
-------------------
गुहागर तालुक्यातील माेडकाआगर पुलाच्या पाहणीदरम्यान महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदाराशी आमदार भास्कर जाधव यांनी चर्चा केली़.