चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलनजिक एसटी थांब्याच्या ठिकाणी थांबलेल्या ट्रेलरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुळचे वेगुर्ले येथील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कामथे येथील एसटी बस थांब्यासमोर रस्त्याच्या कडेला ट्रेलर थांबलेला होता. याचवेळी मुंबईकडून गोव्याकडे जाणारा आयशर टेम्पो ट्रेलरला मागून जोरदार धडकला. या अपघातात ऋत्विक संतोष शिरोडकर (27, भटवाडा वेगुर्ला) व रामचंद्र राजेंद्र शेणई ( 30, परबवाडा वेगुर्ला) या दोन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये शेणई हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होता. काही वर्षापुर्वीच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या अपघातातील धेडकेत आयशर टॅम्पोच्या केबीनचा चक्काचूर झाल्याने त्यामध्ये दोघेही चिरडले गेले. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अडकलेल्या स्थितीत असलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कामथे येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह नातेवाईकांनी वेगुर्ला येथे नेले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस स्थानकात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.
ट्रेलरला आयशर टेम्पोची पाठिमागून धडक, वेंगुर्ल्याच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू
By संदीप बांद्रे | Published: August 08, 2024 4:44 PM