रत्नागिरी : जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले असून, रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची सिंधुदुर्ग येथे निवासी जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. तसेच अन्य महसूल अधिकारी यांच्याही प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून दत्ता भडकवाड यांनी गेली तीन वर्षे उत्तम काम केले आहे. कोरोना काळात तसेच अतिवृष्टीत त्यांनी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने मदतकार्याचे उल्लेखनीय काम केले. नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व कर्मचारी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. त्यांच्या जागी नियुक्ती झालेले सुशांत खांडेकर यांनीही यापूर्वी रत्नागिरीत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी, राजापूर प्रांत, आदी पदांवर काम केल्याने त्यांना रत्नागिरी जिल्ह्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे यांचीही प्रशासकीय बदली झाली असून, त्यांच्या जागी सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रोहिणी रजपूत यांचीही महेश पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर याआधीच नियुक्ती झाली आहे. त्यांनीही याआधी रत्नागिरीत सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त असलेल्या या पदावर तेजस्विनी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तसेच मंडणगडचे तहसीलदार प्रशांत पानवेकर यांची सावंतवाडीचे प्रांत म्हणून नियुक्ती झाली आहे.