रत्नागिरी: एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून संप पुकारला आहे. यामुळे एसटीची सेवा पुर्णता कोलमडली आहे. ही सेवा लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी गणपतीपुळे येथील श्री गणपतीचे दर्शन घेवून गणरायाला साकडे घातले.मंत्री परब यांनी आज, गुरुवारी सकाळी तालुक्यातील प्रसिध्द गणपतीपुळे येथील श्री गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गरीब जनतेची नाळ असलेली एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी गणपती चरणी प्रार्थना केली. दरम्यान, मंत्री परब रत्नागिरीमध्ये ज्या शासकीय विश्रामगृहात थांबले होते, तेथून जवळच एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यामुळे विश्रामगृहातील सुरक्षा आधिक कडक करण्यात आली होती.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे सामान्याचे मोठे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी पायपीट करावी लागत आहे. तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवासांची लुट होत असल्याचे समोर आले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तरी देखील कर्मचारी एसटी विलिनीकरणाच्या आपल्या मागण्यावर ठाम आहेत.