हर्षल शिराेडकरखेड : रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा घाट म्हणजे रघुवीर घाट. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील २० ते २५ गावांना भौगोलिकदृष्ट्या खेड शहर व तालुक्यात सहजपणे जोडणारा रघुवीर घाट १२ किलाेमीटर लांबीचा आहे. समुद्र सपाटीपासून ७६० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कांदाट खोऱ्याला खेड तालुक्याला जोडणारा हा घाटातील प्रवास म्हणजे हृदयाचे ठोके चुकविणाराच असताे.सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या १२ किलाेमीटरच्या रघुवीर घाटात घडत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हा मार्ग वाहतुकीला धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही वर्षांत रघुवीर घाट पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले असून, तीनही मोसमात याठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. खेड आगारातून खेड-उचाट-अकल्पे एसटी बस सुरू असून, खासगी वाहनांची सेवाही सुरू आहे. कोकण व सातारा जिल्हा एकत्र आणणारा हा घाट दळणवळणाच्या दृष्टीने सुरक्षित असणे गरजेचे आहे.खोपी, शिंदी, वळवण, बामणोलीमार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. घाटात पावसाळ्यात अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये एसटी बसेस अडकून पडल्या आहेत.यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घाटातील अवघड वळणावर दोन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. २०११ मध्ये पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे हा घाट तब्बल चार दिवस बंद होता. या घाटाचा प्रस्ताव १९९० मध्ये तयार करून १९९३ मध्ये हा घाट सुरू करण्यात आला. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कांदाटी खोऱ्यातील गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात बांधकाम विभागाने दरड कोसळल्यास रस्ता पूर्ववत करण्यासाठी खोपी येथे जेसीबी उपलब्ध असताे. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रघुवीर घाटात रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.
वनखात्याची जमीनरत्नागिरी-सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे दोन रस्ते खेड तालुक्याच्या हद्दीतून पुढे जातात. रघुवीर घाटमार्गे सातारा आणि हातलोट घाटमार्गे सातारा असे हे दोन मार्ग आहेत. परंतु, या दोन्ही रस्त्यांवर वनखात्याची जमीन आहे. यापूर्वी वनखात्याने परवानगी दिली असती तर हे दोन्ही मार्ग सातारा जिल्ह्याला कधीच जोडले गेले असते.