रत्नागिरी : सर्वच शासकीय कार्यालये आता हायटेक होत चालली आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून वाहक इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनव्दारे (इटीआयएम) तिकीट देत असत. परंतु ११ कोटी ७४ लाखाचा तिकीट साठा शिल्लक राहिल्याने तो संपवण्यासाठी वाहकांनी गळ्यात ट्रे अडकवून पुन्हा एकदा तिकीट ट्रे मधील तिकीटे वितरीत करण्यास प्रारंभ केला आहे.आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनव्दारे शहरी व ग्रामीण, लांब पल्ल्याच्या एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांचे वितरण करण्यात येत होते. या मशिनवरून तिकीट देणे वाहकांना सोपे होत असे. शिवाय इलेक्ट्रॉनिक्स मशिनमुळे प्रत्येक फेरीचा हिशेब लिहिण्याची कटकट संपली होती. तिकीट ट्रेच्या वापरामुळे तिकीटे किती संपली, किती रूपयांची संपली, याचा सर्व हिशेब लिहून ठेवावा लागत असे. मशिनचा वापर सुरू झाल्यानंतर वाहकांनी समाधान व्यक्त केले होते. त्याच दरम्यान रत्नागिरी विभागात ११ कोटी ७४ लाखांचा तिकीट साठा शिल्लक राहिला होता.इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनमुळे हिशेब सोपा झाला होता. फेरी संपल्यानंतर वाहक मशिन कार्यालयात सादर करून हिशेब देत असत. संबंधित मशिनचा ठराविक वापर केल्यानंतर मशिन चार्जिंग करणे गरजेचे आहे. सध्या वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स मशिन वापरण्यास प्रशासनाने बंदी केली आहे.अकरा कोटी ७४ लाखांच्या शिल्लक राहिलेल्या तिकिटाचा साठा खराब होऊ नये. शिवाय महामंडळाचा खर्च वाया जाऊ नये, यासाठी पुन्हा एकदा तिकिटांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.केवळ दहा दिवसांसाठी लागणारा तिकीटसाठा शिल्लक ठेवून उर्वरित सर्व तिकीटे संपविण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार वाहक सध्या तिकीट ट्रे मधील तिकिटे पंचिंग करून देत आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना; परंतु मशिनमधील तिकीटांची पध्दत लांबणीवर पडली आहे.वास्तविक तीन वर्षांनंतर प्रशासनाला तिकीट साठ्याबद्दलची जाग आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांमधून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जुनी तिकीटे संपवण्यासाठी पुन्हा वितरण सुरू.इलेक्ट्रॉनिक्स मशिनमुळे तिकिटांचा हिशोब झाला होता सोपा.सध्या वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स मशिन वापरण्यास एस. टी. प्रशासनाने घातलेय बंदी.
वाहकांच्या गळ्यात पुन्हा ‘ट्रे’ची टीकटीक
By admin | Published: October 28, 2014 11:54 PM