झाडांचे व मानवाचे अतूट नाते असले, तरी मानव आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे. त्याच्या विपरित परिणामाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. एखादे बीज रूजवले की त्याचे रोप बनते. त्यासाठी सुयोग्य जमीन, खत आणि पाणी यांची आवश्यकता असते. झाड ऑक्सिजन निर्मिती करते. तो ऑक्सिजन माणसाला जगण्यासाठी खूपच आवश्यक आहे. निसर्गचक्रात शुध्द हवेची कमतरता झाडे भरून काढतात. झाडांचे महत्त्व लक्षात घेता, वृक्षतोड थांबवून नवीन वृक्ष लागवडीसंदर्भात योग्य पाऊल उचलले पाहिजे, नव्हे तर कृती करणे गरजेचे आहे. पैकी महत्त्वपूर्ण झाडे खालीलप्रमाणे :
अशोक : अशोक वृक्ष लागवड रस्त्याकडेला, बागेसह घरासभोवतीच्या सुशोभिकरणासाठी केली जाते. अशोकाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करून पर्यावरणात सोडते. केवळ ऑक्सिजनचे प्रमाण वाढवत नाही, तर अशोकाचे झाड दूषित गॅस शुध्द करण्याचे काम करते.
नारळ : नारळाची लागवड बागेत किंवा घरे- हॉटेलभोवती केली जाते. नारळाचे झाड उत्पन्न देत असले, तरी हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतो. जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम झाड करते.
जांभूळ : जांभळाची लागवड बियांपासून रोपे तयार करून तसेच पॅच पध्दतीने डोळे भरून अभिवृध्दी करता येते. जांभळाचे झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुध्द करते. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करते. शिवाय फळामध्ये महत्त्वपूर्ण औषधी गुणधर्म आहेत.
कडुनिंब : रस्त्यांच्या दुतर्फा, मोकळया जागेवर कडुनिंबाची लागवड करावी.
अनेक औषधी गुणांनीयुक्त असून, ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याचे काम करते. पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत.
- डॉ. वैभव शिंदे, कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी
गिरीपुष्प
पावसाच्या पाण्यावर सहज वाढणारी झाडे शेताच्या कडेला लावल्याने हवा शुध्दीकरण करतात. तसेच गिरीपुष्प वनस्पतीचा पाला शेतात टाकल्यास पिकाला त्यापासून नत्र, स्फुरद मिळते.
पीक उगवल्यानंतर सरीमध्ये गिरीपुष्पाचा पाला टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
लागवड पध्दत
कोणत्याही रशीत साल असलेल्या वृक्षाची १०-१२ फूट लांबी व २०-२५ सेंमी व्यासाची फांदी अलगदपणे काढून ९० लि. पाण्यात ९ किलो शेणाचे द्रावण तयार करून बुडवून ठेवावी. दोन फुटाच्या खड्ड्यात लागवड करावी. अशाप्रकारे वर्षभरात १० फूट उंचीचे सावली तसेच भरपूर ऑक्सिजन देणारे वृक्ष तयार होतील.