असुर्डे/मनीष दळवी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’, असे तुकाराम महाराज म्हणतात. झाडे फळे, फुले, औषध, सावली देतात हे सर्वांनाच ठाऊक आहे; परंतु कठीण प्रसंगी हेच झाड कोणाचाही आधार नसताना तारणहार बनून जीवदान देणारे भगवान ठरले, अशी प्रतिक्रिया चिपळूण खेर्डी येथील ६० वर्षीय पूरग्रस्त संजीवन सावर्डेकर यांनी दिली.
संजीवन हे खेर्डी एमआयडीसीमधील घरडा केमिकल्स येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घरात कोणीही कमावते नाही. मुलगा बेरोजगार, होतं नव्हतं ते तीन मुलींच्या विवाहमध्ये खर्च झालं. वृद्ध आई अंथरुणाला खिळलेली. त्यामुळे नाइलाजास्तव त्यांना नोकरी करावी लागते. दिनांक २१ जुलै २०२१ रोजी रात्रपाळीसाठी ते कामावर गेले होते. मुलगा डबा घेऊन येणार होता. परंतु, पावसाचा जाेर वाढला हाेता. सर्वत्र अंधार पसरला होता. उशिरापर्यंत मुलाने येण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला डबा घेऊन येण्यास जमले नाही. सिक्युरिटी गार्ड केबिनला ते एकटेच होते. काय करावे सुचत नव्हते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खेर्डी एमआयडीसीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी कंपनीत संरक्षक भिंत तोडून पाणी आत शिरू लागले. केबिनमध्येही पाण्याचा जोर वाढला. कंपनीत आता चारीही बाजूंनी पाणीच पाणी भरले हाेते. कंपनीतील सर्व मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी असतानाही ते हतबल झाले हाेते. उघड्या डोळ्यांनी केमिकलचे ड्रम वाहून देऊ जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कंपनीच्या संरक्षक भिंतीवर ते चढले.
पाणी वाढतच राहिले. शेवटी जवळच असणाऱ्या झाडाचा त्यांनी आधार घेतला. गावात राहिल्यामुळे झाडावर चढता येत होते. त्यामुळे झाडाच्या टोकावर जाऊन बसले. आता कंटेनर वाहून जाताना दिसत होते. कंटेनरवर बसलेली माणसेही वाहून जाताना बघत होते. परंतु तेच हतबल झाले होते. ‘पाऊस कमी होऊ दे, पाणी कमी होऊ दे, माझ्या कंपनीतील व घरातील सर्वजण सुखरूप असू देत’, असे ते देवाजवळ साकडे घालत होते. अतिशय जोराची भूक लागलेली. समोर पाणीच पाणी असूनही ते पाणी पिऊ शकत नव्हते. मधुमेह रुग्ण असल्यामुळे जीव कासावीस झाला होता. दैव बलवत्तर म्हणून ते कसेबसे वाचले, असा अनुभव संजीवन सावर्डेकर यांना आला.
बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत झाडावरच वर-खाली करीत, बसून, कधी उभा राहून बसण्याचा प्रयत्न करीत होतो. तब्बल ३१ तासांनी पाणी ओसरले, तसा मी झाडावरून उतरलो. प्रथम संकटसमयी देवदूत ठरलेल्या झाडाला प्रथम वंदन केले. हळूहळू चिखल-पाण्यातूनच वाट काढीत घरी पाेहोचलो. घर संपूर्ण पाण्याखाली गेलेले; परंतु घरातील माणसे सुखरूप होती. देवाचे आभार मानले. घरी गेल्यावर सर्वांनी मला बघितल्यावर व मी सर्वांना बघितल्यावर हायसे वाटले.
-----------------------------
आईला बघून रडूच काेसळले
माझ्या वयोवृद्ध आईला बघून माझ्या भावना अनावर झाल्या. आईला मिठी मारून धाय मोकलून रडलो. घरातील होते नव्हते ते सारे गेले; परंतु माझी लाखमोलाची माणसे जिवंत होती, हेच माझ्यासाठी सर्वकाही होते. गेले बारा दिवस घरातील चिखल-गाळ उपसत आहे. संसार उभारण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सावर्डेकर यांनी सांगितले.
-------------------
घरच्यांच्या आठवणीने जीव कासावीस
माझे घर खेर्डी बाजारपेठेत असल्याने काय झाले असेल, माझी आजारी, वयोवृद आईचे काय झाले असेल, या काळजीने माझा जीव कासावीस झाला. पाणी आणखी वाढू लागले, तसे माझे ब्लड प्रेशर वाढू लागले. नेटवर्क बंद असल्याने घराशी किंवा कंपनीतील कोणाशीही संपर्क होत नव्हता; परंतु, कोण जाणे, यावेळी जावई मयूर कदम यांचा फोन आला. सर्वजण काळजीत होते. त्यांना मी भिंतीवर उभा आहे, हे सांगतानाच फोन बंद पडला.
110821\4646img-20210809-wa0034.jpg
पूरग्रस्त संजीवन सावर्डेकर...