राजापूर : शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आणि आमदार राजन साळवी (९ जुलै) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सर्वप्रथम शनिवार दिनांक १९ जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या दिवशी प्रथम सकाळी १० वाजता लांजा पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता राजापूर पंचायत समिती आणि सायंकाळी ३ वाजता साखरपा जिल्हा परिषद गट येथे वृक्षारोपण हाेणार आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन ते आमदार राजन साळवींचा वाढदिवस अशा पंधरवड्यात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़. त्यामध्ये लांजा महिला आश्रमातील अनाथ मुलांना शैक्षणिक व खाऊचे वाटप, सॅनिटायझर व मास्कचे वाटप, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यासह कोविड योध्द्यांचा सत्कार असे कार्यक्रम हाेणार आहेत.
खासदार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून शिवसेनेकडून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, राजापूरचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, लांजाचे तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी केले आहे.