लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दोनवेळच्या अन्नासाठी आदिम आदिवासी कातकरी समाजाला आजही तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड, स्मार्टफोन, टॅब किंवा लॅपटॉप आणणार कुठून? विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड युवा मंचाने सामाजिक जाणिवेतून त्यांच्यासाठी एका लॅपटॉपची व्यवस्था करून दिली आहे. या मदतीमुळे पाच गावांतील आदिवासी विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेता येणार असल्याने विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. हा लॅपटॉप मिळवून देण्यासाठी समाजातील युवा नेतृत्व चंद्रकांत जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले.
समाजातील लोकांचे वैचारिक प्रबोधन करून समतापूरक आणि शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांना अभिप्रेत असा समाज निर्माण करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून जितेंद्र आव्हाड युवा मंच काम करत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर या संघटनेचे कार्य सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सभेमध्ये आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव आणि चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत निकम हे उपस्थित होते.
नुकतेच जिल्हाध्यक्ष शिवाजी पेडणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद खेरटकर, चिपळूण तालुकाध्यक्ष सज्जाद कादरी, शहराध्यक्ष रवींद्र आदवडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अशोक भुस्कुटे यांच्या हस्ते नांदीवसे येथे वाडीवर जाऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप प्रदान करण्यात आला. या लॅपटॉपचा नांदिवसे, कादवड, आकले, कोळकेवाडी, ओवळी आदी गावांतील ५०हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कातकरी समाजातील एक सुशिक्षित युवक व कादवडचे उपसरपंच महेश जाधव यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिल्याबद्दल आदिवासी समाजातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी जितेंद्र आव्हाड युवा मंचाचे आभार मानले.
------------------------------------
चंद्रकांत जाधव यांच्याकडे लॅपटॉप सुपूर्द करताना जितेंद्र आव्हाड युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेडणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष शाहिद खेरटकर, चिपळूण तालुकाध्यक्ष सज्जाद काद्री, शहराध्यक्ष रवींद्र आदवडे आणि अशोक भुस्कुटे उपस्थित होते.
130721\img-20210713-wa0016.jpg
आदिवासी विद्यार्थीहि घेणार आॅनलाईन शिक्षणाचे धडे!