देवरूख , दि. १२ : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन बौध्दवाडीतील प्रणाली विलास जाधव (४४) या महिलेने १०८ च्या रूग्णवाहिकेतच काही मिनिटांच्या फरकाने तिळ्यांना जन्म दिला आहे. १०८ च्या रूग्णवाहिकेत महिलेची प्रसुती होऊन तिळं जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जन्माला आलेली तीनही बाळं हे मुलगे आहेत. रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रणाली जाधव या गरोदर महिलेला पोटात प्रसुती कळा येऊ लागल्याने तिच्या नातेवाईकांनी १०८ या रूग्णवाहिकासाठी फोन केला. रत्नागिरीकडे जात असताना पाली येथे या महिलेला प्रसुती कळा असह्य झाल्या. त्यामुळे तिला पाली येथील रूग्णालयात नेण्यात आले. महिलेची तपासणी केल्यानंतर प्रसुतीसाठी डॉक्टरांनी तिला जिल्हा रूग्णालयातच नेण्याचा सल्ला दिला.
पाली येथून काही अंतर कापल्यावर सकाळी ७.४५ वाजता तिला पहिले बाळ झाले. ही रुग्णवाहिका ८.१० वाजता हातखंबा येथे आल्यावर या महिलेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर कुवारबाव येथे रुग्णवाहिका आली असता ८.१७ वाजता या महिलेला तिसरे मुल जन्माला आले. रूग्णवाहिकेतील आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका भागवत-तिदार यांनी या महिलेची प्रसुती सुस्थितीत केली.