रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली. ही घटना बुधवारी (५ जुलै) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, तिन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.या अपघाताची माहिती मिळताच नाणीजधाम रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. मुंबईहून गोव्याच्या दिशेने ट्रकचालक नंदकिशोर रोहिदास (५०, रा. फोंडा – गोवा) हा ट्रक (एजे १४, जीएच ५३२१) घेऊन जात होता. हातखंबा हायस्कूलजवळ अवघड वळणावर ट्रक येताच गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोला मागून धडक दिली. त्यानंतर समाेरुन येणाऱ्या बस (एमएच ०८, एपी ५७२३)ला धडक दिली. भरधाव ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याने ट्रकचे नुकसान झाले आहे.या अपघातातील बस चालक रणजित मनोहर डुकरे (४०, रा. रत्नागिरी ) हे रत्नागिरी आगाराची रत्नागिरी - तुळजापूर गाडी घेऊन जात हाेते. तर गॅस वाहतूक करणारा टेम्पो हा पालीच्या दिशेने जात होता.या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तातडीने अपघातस्थळी सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, घन:श्याम जाधव, हवालदार त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी अपघतातील तिन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी पुढील कार्यवाही पोलिस करीत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तिहेरी अपघात, वाहनांचे नुकसान
By अरुण आडिवरेकर | Published: July 06, 2023 12:42 PM