चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर डेरवणफाटा येथे एका भरधाव टाटा मॅजिकने रिक्षा आणि दुचाकी यांना धडक दिल्याने तिहेरी अपघात होऊन या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. रिक्षा आणि दुचाकीचे नुकसानही झाले आहे. याप्रकरणी टाटा मॅजिकचालक कल्पेश रामचंद्र दुर्गवळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान फिर्यादी रिक्षाचालक मंगेश सखाराम दळवी हे आपली रिक्षा घेऊन डेरवणकडून मुंबई-गोवा महामार्गावर येत असतानाच चिपळूणच्या दिशेकडून मुंबई-गोवा महामार्गावरून दुर्गेश दुर्गवळे हा टाटा मॅजिक घेऊन आला आणि समोरील वाहनाला बाजू घेत असताना त्याने दुचाकी आणि पुढील रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत मंगेश सखाराम दळवी आणि रिया राजेंद्र भुवड हे दोघेजण जखमी झाले आहेत. रिक्षा आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी मंगेश सखाराम दळवी यांनी सावर्डे पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुर्गेश रामचंद्र दुर्गवळे याच्यावर बेदरकारपणे व हयगय करत वाहन चालवून दुसऱ्याच्या दुखापतीस आणि नुकसानाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.