लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील टर्बाईन चोरीनंतर टर्बाईनचा एक पार्ट अद्याप मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता गुहागर पोलीस, सीआयएसएफ व ग्रामस्थ अशी संयुक्त शोधमोहीम घेण्यात आली. वीजनिर्मिती करणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पात टर्बाईन पार्टची सहा महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. वीजनिर्मिती होणाऱ्या पॉवरब्लॉक बाहेरील भागात हे टर्बाईन दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले होते. त्याच कालावधीत चोरी झाली होती. सीआयएसएफचे सुरक्षाकवच भेदून ही चोरी झाल्याने प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी संबंधित चोरट्यांना काही दिवसात पकडले. चोरीनंतर टर्बाईनचा एक पार्ट पालपेणे तळ्याची वाडी येथील रस्त्याशेजारील भागात लपविला होता. मात्र, प्रत्यक्ष चोरीच्या उलगड्यानंतर या भागात हा पार्ट मिळाला नाही. यानंतर पोलीस व सीआयएसएफ यांनी शोधमोहीम घेतली होती. नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता पुन्हा शोधमोहीम घेतली. यावेळी १० पोलीस, सीआयएसएफचे २५ जवान व ग्रामस्थही यात सहभागी झाले होते. दीड तास शोध घेतल्यानंतरही काहीच मिळाले नाही. चोरी होऊन सहा महिन्यांनंतर अचानकपणे ही शोधमोहीम घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
टर्बाईनच्या पार्टसाठी शोधमोहीम सुरु
By admin | Published: June 22, 2017 12:32 AM