रत्नागिरी : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी एस्. टी.सह रेल्वेच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला.
शासनाने अनलॉकची घोषणा केल्यानंतर एस्. टी.सह रेल्वे प्रशासनानेही नियमांचे पालन करून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरूवअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर -सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आणि बेंगळुरू सिटी या चार गाड्या सोडण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दररोजच्या क्षमतेच्या ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. अन्यवेळी हीच संख्या १२५ टक्क्यांपेक्षाही जास्त असते. कोकणातील लोकांच्या मागणीनुसार सुरूवात करण्यात आलेल्या तुतारी एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता मडगावपर्यंत धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. ही गाडी सुरू झाल्याचे रेल्वे गाड्यांचे भारमान वाढण्यास मदत होईल, अशी आशा आहे. सध्या तोटा सहन करूनच या गाड्या धावत आहेत.प्रवासी संख्या घटलीकोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. वर्षभर गर्दीने फुल्ल होऊन जाणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वेन सुरू केलेल्या तुतारी एक्स्प्रेसला पहिल्या दिवशी मुंबईहून ३३ टक्के तर परतीच्या प्रवासात ५९ टक्के तिकीटे आरक्षण झाली होती. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला २४ सप्टेंबरपासून सरासरी ७० टक्के, कारवार एक्स्प्रेसला १५ ते १७ टक्के प्रवाशांनी तिकीट आरक्षित केली होती. हे प्रमाण खूपच कमी आहे.