खेड : दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असून खेड रेल्वे स्थानकात रविवारी मध्यरात्री तुतारी एक्सप्रेस मध्ये शिरण्यास वाव नसल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या वातानुकूलित दरवाजावर लाथा मारत हाणामारी केली. यामध्ये वातानुकूलित डब्याच्या काचा फुटल्याने पाच प्रवासी जखमी झाले.मध्यरात्री दोनच्या सुमारास तुतारी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र रेल्वेचे डबे न उघडल्याने येथील स्थानकात उभे असणाऱ्या प्रवाशांनी तुतारी एक्सप्रेससमोर ठिय्या मांडला. खेड पोलिसांच्या मध्यस्थीने आरक्षित डब्यांचे दरवाजे उघडून खेड स्थानकातील प्रवाशांना रेल्वेत जागा करून देण्यात आली.दीड तासाच्या गोंधळानंतर तुतारी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली. सोमवारी रात्री दोननंतर हा प्रकार घडला. कोकण रेल्वे मार्गावरील नियमित सुटणाऱ्या सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस हे दरवाजे आतून बंद केल्याने खेड मध्ये प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहणाऱ्या शेकडो प्रवाशांना आतमध्ये शिरण्यासाठीदेखील वाव नव्हता. अखेर संतप्त झालेल्या प्रवाशांनी तुतारी एक्सप्रेसच्याया दरवाजांवर लाथा मारायला सुरुवात केली. काही प्रवाशांनी संतप्त होऊन वातानुकूलित डब्यांचा काचा फोडल्या.त्यावेळी दरवाजाला लागून आतमध्ये उभे असणाऱ्या प्रवाशांना काचा लागल्याने पाच ते सहा प्रवासी जखमी झाले. तरीही दरवाजे उघडत नसल्याने ६० ते ७० प्रवाशांनी तुतारी एक्सप्रेस इंजिन समोर जाऊन ठिय्या मांडला. जोपर्यंत दरवाजे उघडत नाहीत तोपर्यंत रेल्वेला मार्गस्थ होऊ देणार नाही, असा पवित्रा शेकडो प्रवाशांनी घेतला. इंजिनसमोर प्रवाशांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.खेड स्थानकात पहाटे दोन वाजता आलेली तुतारी एक्सप्रेस पहाटे साडेतीन वाजता रवाना झाली. तब्बल दीड तास हा गोंधळ सुरू होता. खेड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, पोलीस उपनिरीक्षक भडकमकर यांनी प्रवाशांना शांत केले.
स्टेशन मास्तर सिन्हा यांना विनंती करून आत मधील त्यांच्या कर्मचाऱ्यांना तसेच तिकिट तपासनीसांना आतून दरवाजा उघडण्यासाठी विनंती केली. कोकण रेल्वेच्या नियंत्रण कक्षात संपर्क करून रेल्वेच्या विभागीय कार्यालयातून रेल्वेच्या आत कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासनीसांना ताबडतोब आतून दरवाजा उघडण्यासाठी सांगण्यात आले.
यानंतर वातानुकुलित डबे दरवाजे उघडण्यात आले. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीसांनी इतर स्लीपर डब्यांचेदेखील दरवाजे उघडले आणि खेड प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या सर्व प्रवाशांना आत मध्ये बसविले. यानंतर सुमारे दीड तास खोळंबलेली तुतारी एक्सप्रेस मुंबईकडे मार्गस्थ झाली.