महाड : सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही. जनतेच्या पैशांची लूट आणि विकासकामांची टक्केवारी घेणाऱ्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना किल्ले रायगडावर येऊन महाराजांचे आशीर्वाद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे परखड मत व्यक्त करताना शेतकऱ्यांवर विश्वास टाकला तर भारत महासत्ता बनेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाचाड येथील मेळाव्यात व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती हे ९० दिवसांचे राज्यव्यापी अभियान सुरू होत असून त्याचा प्रारंभ किल्ले रायगड येथून शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, संदीप जगताप, युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे, प्रदेश युवती अध्यक्ष पूजा मोरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जि. प. सदस्य रामचंद्र शिंदे, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
देशाची अर्थव्यवस्था उद्योगधंद्यांमुळे नव्हे तर शेतकऱ्यांमुळे वृद्धिंगत झालेली आहे. त्यांच्यावर विश्वास टाकला तर भारत हा जगाचा अन्नदाता बनू शकतो. मात्र, त्यांचा विचार करण्याची मानसिकता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नाही. - राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
शनिवारी सकाळी शेट्टी यांनी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत या अभियानाचा प्रारंभ केला. या मेळाव्यात शेट्टी यांनी सत्ताधारी व विरोधक या दोघांवरही टीका केली. राज्यकर्ते शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून भ्रष्टाचार करत आहेत. एखादा अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी लाखो रुपये घेत आहेत. या लाचखोरीचा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या जीवनावर होत आहे. आपल्या या अभियानातून शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडू, असे ते म्हणाले.