रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.पालकमंत्री वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आंबा हे फळ जास्त दिवस टिकणारे नाही. त्यामुळे त्याचा साठा करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. या फळावर वातावरणाचा परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने शेतकरीवर्गाचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी मेळावे आयोजित करावेत, असेही यावेळी त्यांनी सूचित केले.कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधीत विभागाने शेतकऱ्यांपर्यंत जाऊन योजनेची माहिती द्यावी. आधुनिक पध्दतीने शेती करून आंब्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते.