रत्नागिरी : शहरानजीकच्या सडामिऱ्या येथे पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात महिलेच्या दुचाकीवर लाथ मारून तिला पाडण्याचा प्रयत्न एका महिलेकडूनच झाला. यावेळी ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पूजा सुकांत सावंत (सडामिऱ्या, रत्नागिरी) तरुणीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नाली सुकांत सावंत (३२, रा. तरवळ सुतारवाडी, रत्नागिरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. मंगळवारी सायंकाळी स्वप्नाली सावंत या आपल्या सासरी सडामिऱ्या येथील नवलाई मंदिरामध्ये गेल्या होत्या. तेथून परत येताना पूजा सावंत हिने पाठीमागून येऊन स्वप्नाली सावंत यांच्या दुचाकीवर लाथ मारून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ठार मारण्याची धमकीही दिली, असे स्वप्नाली सावंत यांनी आपल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.