इचलकरंजी : येथील विधवा महिलेला फसवून तिच्याशी विवाह करून तिला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात शनिवारी येथील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कोरोची येथील शिक्षण संस्थाचालक प्रा. शरद कांबळे व मच्छिंद्र मोहिते (रा. कोसुंब-देवरुख, जि. रत्नागिरी) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. इचलकरंजी येथील गोकुळ चौक परिसरात पीडित महिला राहते. तिच्या पहिल्या पतीचे २००९ मध्ये झालेल्या दंगलीमध्ये निधन झाले. तिला दोन लहान मुले आहेत. कोरोची (ता. हातकणंगले) येथील प्रा. शरद कांबळे याने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून या महिलेशी संपर्क साधला आणि देवरुख येथील मच्छिंद्र मोहिते या बड्या इंजिनिअरशी तुझा विवाह लावून देतो, असे सांगितले. तसेच तो तुझ्या मुलांना पण सांभाळेल, असे आमिष दाखविले आणि शरद कांबळे याने या विवाहासाठी महिलेच्या कुटुंबीयांकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मुलीचे चांगले होईल या हेतूने कुटुुंबीयांनी तडजोड करून ८० हजार रुपये कांबळे याला दिले. त्यानंतर देवरुख येथे २१ फेब्रुवारी २०१६ रोजी मोहिते याच्याशी या महिलेचा एका मंदिरात विवाह पार पडला. सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतानाच या महिलेचा दुसऱ्या दिवशीच भ्रमनिरास झाला. घरात मद्यपी लोकांचा वावर, त्यांचे अश्लील बोलणे, यासह मोहिते याच्या अत्याचाराला सामोरे (पान ९ वर) (पान १ वरून) जावे लागले. शरद कांबळे व मोहिते दोघेही घरात अर्धनग्न अवस्थेत फिरत. तसेच तिच्याशी अश्लील चाळे व लगट करण्याचा प्रयत्न करीत. मोहिते हा अन्य एका महिलेशी फोनवरून अश्लील संभाषण करीत असे. याच दरम्यान बंगल्यातील इतर खोल्यांमध्ये आश्रमातील काही महिलांचा इतर व्यक्तीसोबत वावर असायचा. या महिलाही अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याने आपणासही वाममार्गाला लावण्याचा संशय पीडित महिलेला आला. त्यामुळे तिने धाडसाने आपल्या भावासह पित्याशी संपर्क साधून यासंबंधीची माहिती दिली. त्यांच्या माध्यमातून आपली सुटका करून घेतली असल्याचे तक्ररीत म्हटले आहे. घडलेली घटना या महिलेने मनसेच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा हेगडे व कार्यकर्त्यांसमोर कथन केली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सदर महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शरद कांबळे व मच्छिंद्र मोहिते या दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलिस निरिक्षक संजय साळुंखे करीत आहेत.
महिलेला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 20, 2016 12:29 AM