वैभववाडी : विजयदुर्ग-गिर्ये येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारण्यास केंद्र सरकार आणि जेएनपीटी अनुकूल आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यासाठी विजयदुर्ग- वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी भाजप प्रयत्नशील आहे, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.जनसंपर्क दौऱ्यानिमित्त जठार बुधवारी वैभववाडीत आले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, उत्तम सुतार, मनोहर फोंडके, सुधीर नकाशे, रामेश्वर सावंत आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, आंतरराष्ट्रीय बंदरासाठी लागणारी समुद्राची खोली गिर्ये येथे उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शविल्यानंतर बंदर उभारणीसंदर्भात जेएनपीटीने ठराव संमत करून विजयदुर्ग गिर्ये येथे सर्व्हेही सुरू केला आहे. या बंदरामुळे धान्य, मळी, साखर आदी मालाच्या जलवाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला रेल्वेने जोडण्यासाठी विजयदुर्ग- वैभववाडी- कोल्हापूर हा रेल्वे मार्ग होणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. या मार्गामुळे कमी अंतरात आणि कमीत कमी पुनर्वसनात कोल्हापूर व विजयदुर्ग जोडले जाऊ शकते.गौणखनिजाच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने गुरूवारी पर्यावरण संचालकांसमवेत मुंबईत बैठक होत आहे. त्यामध्ये आवाज फाऊंडेशनचा मूळ मुद्दा आणि सरसकट घातली गेलेली उत्खनन बंदी यातील फरक पर्यावरण खात्याच्या निदर्शनास आणला जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प, तसेच महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत २० ते २२ दरम्यान संबंधित खात्यांच्या मंत्र्यांच्या भेटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मी तसेच राजन तेली व अतुल काळसेकर जिल्हा विकासाचे प्रश्न मांडणार आहोत. असे स्पष्ट करतानाच सरकारच्या माध्यमातून विकासनिधी गावागावात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जठार यांनी सांगितले.जनसंपर्क दौऱ्यानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना गावांचा विकास आराखडा तयार करून कामांची विभागणी करण्याची सूचना देण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गावात भाजपातर्फे मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील धरणांच्या कालव्यांसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना माजी आमदार राजन तेली, काळसेकर आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)मिरजेत रेल्वे परिषदविजयदुर्ग- गिर्ये येथे आंतरराष्ट्रीय बंदर होऊ घातले जात असतानाच सुरेश प्रभूंना रेल्वे मंत्रालय मिळाले आहे. त्यामुळे विजयदुर्ग- कोल्हापूर रेल्वे मार्ग होण्यासाठी लवकरच मिरज येथे प्रभू यांच्या उपस्थितीत रेल्वे परिषद आयोजित केली जाणार आहे. त्या परिषदेमध्ये कारखानदार, उद्योजक व शेतकऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. परिषदेच्या माध्यमातूनच विजयदुर्ग- कोल्हापूर रेल्वे मार्गाची मागणी रेटण्याची भाजपा प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले.
विजयदुर्ग-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील
By admin | Published: November 19, 2014 11:01 PM