मंडणगड : शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गतरत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील बाणकोट मार्गावरील तुळशी व माहू दरम्यानचा घाट व मंडणगड - खेड मार्गावरील केळवत घाटात नागरिक, भाजी विक्रेते, मटन, चिकन विक्रेते यांच्याकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याकडे नगरपंचायत, भिंगळोली ग्रामपंचायत व प्रशासनानेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने घाटातील कचºयाची समस्या वाढतच असून, या निसर्गरम्य घाटांना कचरा डेपोचे स्वरुप आले आहे.
मंडणगड नगरपंचायतीकडून गेली काही वर्ष शहरात जमा होणारा कचरा घंटागाडीच्या सहाय्याने या परिसरात आणून टाकला जात होता. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर येथे कचरा टाकणे बंद करण्यात आले. मात्र, शहरातील दुकानदार, नागरिक अजूनही येथे रात्री, दुपारी लपूनछपून गाडीतून गोण्या भरून कचरा, घाण, अनावश्यक वस्तू आणून घाटात टाकत आहेत. हीच परिस्थिती भिंगळोली ग्रामपंचायत हद्दीत असणाºया केळवत घाटात असून, याठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा टाकलेल्या ठिकाणी मोकाट जनावरे जमा होत असल्याने त्यांचा त्रास प्रवासी, वाहनचालक यांना होत आहे. हे निसर्गरम्य घाट कचºयाच्या विळख्यात सापडल्याने विद्रुप झाले आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे मंडणगड शहरात व शहरालगत असलेली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत भिंगळोली येथील कचराप्रश्न अधिक जटील होत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज शहरातून सुका, ओला कचरा घंटागाडीच्या सहाय्याने एकत्रित करून त्याचे संकलन अथवा विल्हेवाट लावली जाते. तरीही नागरिक, दुकानदार प्रशासनाला सहकार्य न करता, कचरा घाटात टाकण्यात धन्यता मानतात. हा कचरा चोरीछुपे टाकला जात आहे.
भिंगळोली ग्रामपंचायतीने कचरा समस्येसाठी कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. स्थानिकांसह इतर गावांतील आठवडा बाजारासाठी आलेले भाजी विक्रेते हे केळवत घाटात कचरा टाकतात. त्यामुळे घाटातील कचºयाचा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.
माहू, तुळशी घाटात कचरा न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही जर असा प्रकार होत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. - राहुल कोकाटे, उपनगराध्यक्ष, मंडणगड नगरपंचायत