आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या हळदीच्या एसके - ४ (स्पेशल कोकण-४) वाणाची यंदा रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २० एकर क्षेत्रावर लागवड होणार आहे. यापैकी १० एकरची लागवड ही हळकुंडापासून तर १० एकरची लागवड ही हळकुंडापासून तयार केलेल्या रोपांच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सचिन कारेकर यांनी दिली.
गेली २० वर्षे हळद लागवड करून आबलोली येथील सचिन कारेकर यांनी निवड पद्धतीने एसके-४ हळदीच्या वाणाची नवीन जात विकसित केली. गेल्या ४-५ वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह शेजारच्या सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांपर्यंत हे हळदीचे वाण पोहोचले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन व हवामानात उत्तम प्रकारे उत्पादित होऊ शकणारे व कीड रोगाला प्रतिकारक अशा या हळदीचे वाण आता शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचू लागले आहे.
शेतकऱ्यांकडून एसके-४ बियाण्याची लागवड करण्याकडे असलेला ओढा लक्षात घेता, डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी हळकुंडापासून रोपे तयार करण्याचे विकसित केले आहे.
या वर्षी गुहागर व मंडणगड तालुक्यात अनुक्रमे प्रत्येकी ५०,००० प्रमाणे १ लाख रोपांची निर्मिती करण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तर १० एकर क्षेत्र हे हळकुंड बियाण्यापासून लागवडीखाली येणार असल्याचेही सचिन कारेकर यानी सांगितले.
मंडणगड तालुक्यातील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी तेथे ५ एकर क्षेत्रावर हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम करून, तालुक्यात प्रथमच उत्तम प्रकारे लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे ४०,००० रोपांची रोपवाटिकाही तयार केल्याचे कारेकर यांनी सांगितले.
.............................
गुहागर तालुका
आबलोली - २० हजार
कोतळूक - २० हजार
निगुंडळ येथे १० हजार
मंडणगड तालुका
कुंबळे - ५० हजार