खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी यंत्रणांची दिवसरात्र घरघर गतीने सुरू आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी आंबवलीच्या दिशेने जाणारा मार्ग गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे आंबवली मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना वळसा मारावा लागत आहे.
चौपदरीकरणाच्या कामामुळे दोन्ही बाजूंना एकेरी मार्ग सुरू असल्याने वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे
सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी ३३ मीटर लांबीच्या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला चढता व उतरता पूल उभारण्यात येणार असून. एकाचवेळी ६ वाहने मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय रहदारीसाठी तीन सर्व्हिस रोडची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे भुयारी मार्गाच्या कामाची गती मंदावेल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, हा अंदाज फोल ठरला असून, लॉकडाऊन कालावधीतही ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. याचमुळे आंबवलीच्या दिशेने जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. बंद करण्यात आलेल्या मार्गाच्या ठिकाणी लवकरच काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामामुळे आंबवलीच्या दिशेने जाण्यासाठी वळसा मारण्याची नामुष्की वाहनचालकांवर येऊन ठेपली आहे. आधीच दोन्ही बाजूंना एकेरी मार्गाचा अवलंब सुरू आहे. एका बाजूकडून छोटी वाहने तर दुसऱ्या बाजूकडून मोठी वाहने मार्गस्थ करण्यात येत आहेत. त्यात आंबवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचीही भर पडल्याने या मार्गावर वाहनांची सतत कोंडी होऊ लागली आहे.
....................................
khed-photo61
खेड येथील आंबवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना भुयारी मार्गाच्या कामामुळे मार्ग बंद
करण्यात आला आहे.