अडरे : चिपळुणातील राणे आणि जाधव समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी चिपळूण पाेलिसांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणखी नऊजणांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून, ८ जणांना न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित चारजणांना साेमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी जाेरदार राडा झाला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. पोलिस हवालदार प्रशांत वामन चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पाेलिसांनी दाेन्ही गटांतील तब्बल ४०० जणांवर गुन्हे दाखल केले असून, अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. या राड्याप्रकरणी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे यांना अटक केली हाेती. त्यांना आधीच न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.
तर रविवारी सकाळी राम डिगे, संजय भुवड, सुनील तांबडे, संजय गोताड, राजू गायकवाड यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच सायंकाळी प्रभाकर जाधव, प्रकाश जाधव, दिलीप साबळे, विक्रम साळुंखे या चाैघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना साेमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांना नाेटीसदरम्यान, शुक्रवारी हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. चिपळूण भाजपचे तालुकाप्रमुख वसंत ताह्मणकर व परिमल भोसले या पदाधिकाऱ्यांना या नोटीस देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.