खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेड व दापोली तालुक्यांसाठी दोन अत्याधुनिक सुविधांनी सज्ज कार्डियाक रुग्णवाहिकांचे लोकार्पण पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून खेड, दापोलीवासीयांच्या सेवेसाठी दोन सुसज्ज अशा कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आल्या.
या रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज असून, त्यांचा फायदा नागरिकांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी होईल. या रुग्णवाहिका अत्यवस्थ असलेल्या व्यक्तीची जीवन तारणारी माउली म्हणून नावारूपास येतील, असा विश्वास यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या दोन्ही रुग्णवाहिकांचे नियोजन व सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी खेड येथील मनसेचे कार्यकर्ते बुरहान टांके यांच्याकडे असणार आहे.
या लोकार्पण कार्यक्रमाला मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, महिला सेना उपाध्यक्ष व कोकण संपर्क नेत्या स्नेहल जाधव, खेड शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, मनविसे जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, ऋषिकेश कानडे, मनविसे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, उपजिल्हाध्यक्ष साईराज देसाई, खेड तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहराध्यक्ष राजू आंब्रे, रहीम सहिबोले, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अरविंद पुसाळकर, स्वरूप माजलेकर, बुरहान टाके, जयेश गुहागरकर, शैलेश गायकवाड, सुजित गायकवाड, सर्वेश पवार, दिनेश सकपाळ, साहिल शेलार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.