रत्नागिरी/खेड : थरारक पाठलाग करुन रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड येथील ५९ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा सूत्रधारासह अन्य दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून रोख २८ लाखांसह ३३ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. लुटीतील रोकड घेऊन गोव्याकडे जाण्याचा या चोरट्यांचा प्लॅन पोलिसांच्या कामगिरीमुळे उधळला गेला आहे.या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. गुरूवारी आणखी तिघांना अटक झाल्यामुळे आता १४ पैकी १२ संशयित गजाआड झाले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी आरोपींचा शोध घेत होते.
गुरूवार, दि. १ रोजी यातील मुख्य सूत्रधार आरोपी किशोर उर्फ बिहारी रघुनाथ पवार (३६, हर्णै, ता. दापोली) व त्याचे साथीदार सत्यवान जनार्दन साळुंखे (२९, सर्वे, ता. श्रीवर्धन), सचिन लहू जाधव (३०, मूळ पानशेत, पुणे, सध्या हर्णै, ता. दापोली) कारने गोव्याला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचून थरारक पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून २८ लाख ५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, कार, मोबाईल असा एकूण ३३ लाख ९ हजार ४४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस हवालदार संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, पोलीस नाईक विजय आंबेकर, सागर साळवी, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे, रमीज शेख, महिला हेडकॉन्स्टेबल अपूर्वा बापट यांनी केली. या शोधपथकाचे पोलीस अधीक्षक डॉ़ गर्ग व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.