रत्नागिरी
: रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांच्याकडे २५ लाख रुपयांची
खंडणी मागितल्या प्रकरणातील दोघांना न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षांची
साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात निशांत ऊर्फ सनी प्रवीण परमार
(वय ३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०, दोन्ही रा. दहिसर, मुंबई) अशी शिक्षा
सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात दीपक
पांडुरंग गद्रे (रा. पावरहाऊससमोर, नाचणे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण
पोलिसांकडे तक्रार दिली होती. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी निशांत परमार याने
दीपक गद्रे यांना फोन केला. मी मुंबईतून बोलतोय, असे सांगत तुम्ही एकाला
चोरटे पिस्तूल घेण्यास सांगितले होते, तो माणूस माझ्या ताब्यात असून, हे
प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून गद्रे
यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दीपक गद्रे
यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. या आरोपींवर संपूर्ण
महाराष्ट्रात ५५ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
याचा तपास
करताना ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा
दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी निकाल देताना
बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी इटकळकर यांनी आरोपींना २ वर्षे ६ महिने साधी
कैद आणि १ हजार रुपये दंड, तो न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा
सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. एस. वाधवणे,
अॅड. इम्रान मुजावर आणि अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. तसेच
तपासिक अंमदलार म्हणून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस नाईक
अमित कदम, हेड काॅन्स्टेबल दीडपिसे, पोलीस नाईक विलास जाधव यांनी, तर पैरवि
अधिकारी म्हणून सहायक पोलीस फौजदार अनंत जाधव आणि मदतनीस म्हणून महिला
पोलीस नाईक संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.