रत्नागिरी : रत्नागिरीच्या समुद्रात अनधिकृतपणे पर्ससीन मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन नौकांवर धडक कारवाई करण्यात आली. सागरी सुरक्षा दलाने आरे - वारे (ता. रत्नागिरी) समुद्रात मंगळवारी (दि.२७) सकाळच्या दरम्यान ही कारवाई केली. या दोन्ही नौका पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.रत्नागिरीच्या समुद्रात परराज्यातील नौका मासेमारी करत असल्याचे रत्नागिरी सागरी सुरक्षा दलाच्या लक्षात आले. सागरी सुरक्षा पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटेकर, मनोज कुमार सिंग, कैलास भांडे, पी. के. सारंग, पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल विनोद शांताराम महाडिक व सुरज जाधव या टीमने ही कारवाई केली.
या कारवाईत मिसीसीपी १ व स्टार ऑफ विलिनकिनी २ या दोन नौका पकडण्यात आल्या. या दोन्ही नौका पर्ससीन मासेमारीच्या असून, आरे-वारे समुद्रात दोन वावाच्या आत अनधिकृतरीत्या मासेमारी करताना आढळल्या. या दोन्ही नौकांवर तांडेलसह सुमारे ३० ते ३५ खलाशी होते.खलाशांवर मत्स्य विभाग कारवाई करणाररत्नागिरी मत्स्य खात्याचे अधिकारी पाठारे यांच्या ताब्यात या नौका देण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर दोन्ही नौका रत्नागिरीतील भगवती बंदरात आणून नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरील खलाशी लोकांवर पुढील कायदेशीर कारवाई मत्स्य विभागाकडून करण्यात येईल, असे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.