लांजा : तालुक्यातील गाेवीळ घावरेवाडी येथून तळवडे (ता. सावंतवाडी) येथे साखरपुड्याला जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी लांजा तालुक्यातील आसगे येथील झरीचा पऱ्या येथील वळणावर झाला.अशाेक अर्जुन जाधव (४६) आणि त्यांचा चुलत भाऊ प्रकाश साबाजी जाधव (६२), असे मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत. गोवीळ घावरेवाडी येथील अशोक जाधव हे दुचाकी (एमएच ०८, एफएच १९६०) घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळवडे येथे साखरपुड्याला निघाले हाेते. त्यांच्यासाेबत त्यांचे चुलत भाऊ प्रकाश जाधव हे हाेते. ते दुचाकी घेऊन आसगे झरीचा पऱ्या येथील वळणावर दुपारी २:३० वाजेदरम्यान आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरात हाेती की, अशोक जाधव व प्रकाश जाधव हे रस्त्याच्या बाजूला दगडावर जाऊन पडले. दोघांच्याही डोक्याला, हाताला गंभीर दुखापती झाली हाेती. या अपघातात अशोक जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दाेघांनाही उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता अशोक जाधव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या अपघातातील गंभीर जखमी झालेले प्रकाश जाधव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे घेऊन जात असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या अपघाताची माहिती लांजा पोलिसांना मिळताच सहायक फौजदार भालचंद्र रेवणे, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नासिर नावळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.
Ratnagiri: अज्ञात वाहनाची धडक, साखरपुड्यासाठी जाताना दोन भावांचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:18 PM