लांजा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी (२९ ऑक्टाेबर) दुपारी १ वाजता पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली हाेती. सायंकाळी ७ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच ७.१५ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर उलटला.गोव्यामध्ये मच्छी भरून कंटेनर चालक बाळाजी गणपतराव पडळकर (रा. कर्नाटक) हा कंटेनर (एमएच ४६, बीयू ९३२६) घेऊन मुंबई येथे जात हाेता. वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी, दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कंटेनर आला असता खड्ड्यात कंटेनरचा मागील भाग आपटला व संपूर्ण कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. रत्नागिरीहून सायंकाळी दोन क्रेन आल्यानंतर कंटेनर सरळ करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर एका बाजूला ठेवण्यात आला. मात्र, त्यावरील बाॅक्स दोन क्रेननेही उचलता येत नसल्याने रत्नागिरीहून तिसरी क्रेन बोलावण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली.अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील, एम. जी. पावसकर, घनश्याम जाधव, सचिन सावंत, दरपेश आग्रे यांनी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने बससेवा काजरघाटी मार्गे वळवण्यात आली होती.कंटेनर बाजूला करुन वाहतूक सुरळीत हाेत असताना सायंकाळी ७.१५ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर खड्ड्यामुळे पलटी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. रात्री उशिराने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
रत्नागिरी: वेरळ घाटात काही तासातच दोन कंटेनर झाले पलटी, सहा तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 1:21 PM