खेड : शहरातील सुखतळे मैदानाची निर्मिती, सुशोभिकरण व योगिता डेंटल कॉलेजसमोरील नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी खेड येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान, या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये सुखतळे येथे भराव टाकून जागेचे सपाटीकरण, जॉगिंग ट्रॅक, झाडे लावणे, बाकडे बसविणे, सोलर लाईट बसवणे, मैदानाच्या सभोवती संरक्षक भिंत उभारणे आणि अन्य विकासात्मक कामांसाठी या निधीतून केली जाणार आहेत.
सद्यस्थितीत शहरात प्रबोधनकार ठाकरे उद्यान, जिजामाता उद्यान व नाना नानी पार्क अशी तीन उद्याने नागरिकांना विरंगुळ्यासाठी उपलब्ध आहेत. शहरातील ब्राम्हणआळीसह शहरवासीयांनी अद्ययावत सुविधायुक्त मैदान व उद्यानाची मागणी आमदार योगेश कदम यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार कदम यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. दापोली मार्गावर योगिता डेंटल कॉलेजच्या समोर असलेल्या नाल्यावर संरक्षक भिंत उभारण्यासाठी ३० लाख रुपये, सुशोभिकरण व गणपती विसर्जन घाट बांधण्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा पूर्ण निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे.